शनिवार, ८ ऑगस्ट, २००९

वाळवंट !

आज पुन्हा एकदा तीच सुरुवात - तेच झोपेतुन उठणे, तीच पुन्हा अंघोळ, तेच परत जेवन, तीच दुपारची छानशी वामकुक्षी, तोच पुन्हा ४:०० चा चहा, तेच तेच तेच तेच ...... आणि फक्त तेच. आयुष्य जणू एक साचाच बनला आहे. कधी कल्पना देखील केली नव्हती की आयुष्य असे इतके सरळसोट बनेल!

तसे पाहता वरून केवळ एक नीरव शांतताच दिसत असते. परंतु आत कोठेतरी एक लाव्हा सतत उफाळत असतो - सदान्-कदा बंड पुकारत असतो, मनाच्या तटबंदीला रोज असंख्य बाभळी बोचत असतात; परंतु ना त्याच्या खुणा दिसतात ना दिसते अखंड वाहणारे लाल पाट! फक्त आतुन काही तरी जळत असते - सलत असते अखंड काहीतरी.... खुप आक्रोश करावासा वाटतो पण..... पण या आक्रंदनांचा ना आवाज येतो ना अश्रुधारा वाहतात. सर्व काही शांत्,फक्त वरून - आतून मात्र संग्राम अखंड संग्राम!! रोज क्षणोक्षणी हलाहल पिऊन ना मी नीलकंठ झालो ना नागराज!

प्रत्येक पाण्यात आकंठ बुडलो होय आकंठ - अगदी नाका - तोंडात पाणी जाईपर्यंत तरीही बाहेर पडलो तो केवळ कोरडा - कोरडा ठणठणीत! आयुष्य एक वाळवंट झाले आहे - तेही सदाहरित!! उडेल का इथे एक अल्लड नादान फुलपाखरु? उमलेल का कधी इथे एक सुंदरशी कळी? खरेच या वाळवंटाचा कधी होईल का बगीचा? की असेल ते एक छोटसंच ओएसिस - उरलेलं सगळ रन आणखी भाजुन काढणारं!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger