मंगळवार, २५ ऑगस्ट, २००९

थांबा 4G येतोय!

नुकतीच हीही बातमी वाचण्यात आली!
या बातमीनुसार मोटोरोला भारतात 4G सुविधा अजमावून पाहणार आहे. पण 3G पचवता-पचवता नाकी नऊ आलेल्या आपल्या दुरसंचार मंत्रालयाला व आपणाला 4G ( ज्यात Data Transfer Rate जवळपास 100Mbits/s म्हणजे BraodBand पेक्षा कितीतरी पट जास्त ) म्हणजे बाऊन्सरच असणार आहे. बा़की 4G च्या टेस्टींगसाठी frequency देण्याच्या करण्याबाबतीत मंत्रालयातर्फे काय धोरण राबविले जाणार ( कारण गुगलवरच पहा! ) याच्याबद्द्लचा विचार सोडून देऊन मी जालावर(अर्थातच गुगलवर) काही माहिती शोधली.
त्यावरून प्रकर्षाने जाणवले की आपल्या भारतात संशोधनाला मुळात ना सरकार प्रोत्साहन देते ना भारतीय कंपन्या त्यामुळे संशोधनात आपला देश मागा आहे. याउलट आपला ओढा आहे तो असलेले तंत्रज्ञान वापरण्यात व सेवा पुरवण्यात! पण याचा सर्वाधिक नफा होतो तो त्या देशांना ज्यांनी त्या उभारण्यात पुढाकार घेतला आहे. बाकी जास्त लिहीणे नको!

रविवार, २३ ऑगस्ट, २००९

गणपती बाप्पा मोरया!


सर्वांना
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!




गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया

गुरुवार, २० ऑगस्ट, २००९

राम राम गुगल अर्थ !

मित्रांनो आता आपणाला आपल्या शहराला अथवा घराला नकाशावर पहायचे असल्यास कोण्या गैर-भारतीय साईट वर जायची गरज नाही. कारण आता ही सुविधा आपल्या भारतीय तंत्रज्ञांनी स्वतः विकसित केलेली आहे आणि ती सध्याला प्रायोगिक तत्त्वावर भारतीय संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि तीही चांगल्या Quality मधे. ISRO(Indian Space Research Organization) ने आता आपले स्वत:चे Bhuvanbeta - भुवन या नावाने गुगल अर्थ हून चांगल्या प्रतीचे mapping application तयार केले आहे. तर मग एकदा तरी आजमावून पहा.




भुवनहून साभार


भुवनचे संकेतस्थळ : http://bhuvan.nrsc.gov.in/



अधिक माहितीसाठी भुवन तसेच विकीपेडिया पहा.

बुधवार, १९ ऑगस्ट, २००९

बंड


आज बंड करायचाय मला तुझ्याविरुद्ध
होय फोडून काढायचय तुला चाबकांनी
पिचलेल्या मना खुन करायचाय तुझा
पुन्हा एकदा द्यायचाय जन्म क्रांतीला
तोडून द्यायची आहेत सारी खोटी बंधने
पुन्हा उधळायचय मला बेभान माजून
घडवायचय नवीन जग पुन्हा एकदा
माणूस बनवायचाय मला या माकडांतून
शिकवायचीय त्याला पुन्हा एकदा नैतिकता
ठासून भरायचीय मला त्याच्यात हिंमत
पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी काळाच्यापुढे
बनवायचय त्याला सक्षम पोलादासारखं
पुन्हा एकदा बंड करण्यासाठी तुझ्याविरुद्ध

----बाळराजे

मंगळवार, १८ ऑगस्ट, २००९

सर

जेव्हा भर उन्हात पावसाची सर आली
पुन्हा एकदा आज तुझी आठवण आली
सरीसारखीच आली होतीस जीवनात
आठवतय तेव्हा देखील उन्हाळाच होता....इथे

बरसली होतीस, थैमान घातला होतास
अगदी पुरता वाहून गेलो होतो त्यात मी
कशी बाहूत कोसळली होतीस मनापासुन
आठवतय तेव्हा देखील तहानलेलाच होतो....आजच्यासारखा

गेलीस देखील आल्यासारखी तडकाफडकी
तेव्हा ही आला होता पूर इथे - माझ्या डोळ्यांत
पहायचस तरी मागे वळून तिथेच होतो मी
आठवतय का तेव्हा देखील जळतच होतो....सुर्यासारखा

येशील का पुन्हा एकदा, बरसशील का इथे
विझवशील का अखंड जळणारे हे जंगल
वसवशील का नंदनवन या ओसाड रानात
आठवतय तेव्हा देखील माळरानच होतं....आजच्यासारखं

----बाळराजे

रविवार, १६ ऑगस्ट, २००९

प्लिज जरा थांबशील का ?

प्लिज जरा थांबशील का?
नाही मी रागावणार नाही
पण चार शब्द ऐकूनच जा
अगदी शेवटचे...........

तु मुळात बरोबरच आहेस
चुकलो तो केवळ मीच
वेड्या मनाला कळलेच नाही
तुझ्या गालावरची ती खळी
अगदी चिरतरुण आहे ते

तुझे ते स्मित वाटले जणु
रणरणत्या ग्रिष्मात पाऊस
बरसतोय जणु माझ्याचसाठी
भिजलो त्यात चिंब अनेकदा

तेच तुला आज सांगितले
केवळ शब्दांतून..........

नाही म्हणालीस...ठीक आहे
पण तुला काही सांगायचे आहे
अगदी शेवटचेच...........

तुच होतीस एक शांत झुळूक
या करपलेल्या आयुष्यातली
तुच होतीस गर्द सावली
या ओसाड वाळवंटातली

तु नसणार यापुढे...
पण तुझ्या आठवणी...
राहतील अगदी चिरतरुण
तुझ्या गालावरच्या खळीसारख्या

सदैव राहशील तु मनात
एक कवडसा म्हणून...सुखाचा

आणि हो जाता जाता...
तुझा आजचा नकार...
असेल माझ्या आयुष्यातल्या
एका सुखद क्षणांचा अंत

एवढेच.........बस्स....

----बाळराजे

बुधवार, १२ ऑगस्ट, २००९

तो आणि ती - कथा पहिली

भाग -

तशी गोष्ट अगदीच सर्वसामान्य आहे. अगदी आपल्या शेजारीच घडणारी. एका 'तो' ची आणि एका 'ती' ची. ह्यात काही सिनेमातल्याप्रमाणे ना टिपीकल प्रेम जसे एक नायिका नायकाला रडत रडत सांगत असते - "xxx मैं तुम्हारे बिना नही जी सकती| " अथवा नायक जीव तोडून नायिकेला सांगत असतो - "xxx अगर तुम हाँ कह दो तो मैं तेरे लिए चाँद और तारे तोड लाऊंगा| ", ना ते झाडामागून चकरा मारत गाणे. ही अगदी common कथा आहे. ह्या कथेचा नायक एक सर्वसामान्य 'तो' असतो. आणि त्याचे एका 'ती' वर प्रेम असते, बस्स!
'तो' नुकताच H.S.C. पास झालेला. एक देखील मिसरुड न फुटलेला - पण तरीही लौकिकार्थाने तरुण झालेला! मार्क्स तसे बेताचेच पण का कोण जाणे त्याच्या आई-वडिलांच्या लेखी मात्र - "आमचा सोन्या ना खुप हुशार हो! त्याला ना बारावीत ७२ टक्के गुण मिळाले!!". आता तुम्हीच सांगा H.S.C. ला ७२% गुण घेणार्‍या आणि CET ला ९९ गुण(!......२०० पैकी हो!!) घेणार्‍या सोन्याला का कोणी हुशार म्हणेल? की कोणत्या 'इंजिनिअरिंग' कॉलेज मध्ये त्याचा Open मधुन नंबर लागेल? काय तर म्हणे 'आमचा सोन्या हुशार!'. पण बिचारे ते तरी काय करणार म्हणा आपलेच दात आणि आपलेच ओठ; झाकतात आपल्या पिलाला आपल्या पंखांखाली.
पण हा पठठ्या मात्र खुश! भरतो आपला CAP राऊंड्चा फॉर्म! पण बाप मात्र पुरता सावध असतो - अगदी पोराच्या नकळत त्याची अँडमिशन करुन देखील टाकतो - मॅनेजमेंट्मधुन!! हो अगदी स्वतःच्या आदर्शांना बाजुला सारुन... करणार काय, ज्या आदर्शांबरोबर स्वतःची माती झाली त्यांचा वारसा मुलाला देण्यास एक बाप म्हणुन त्याचे मन कच खात होतं..... सरळ काढलं राहत्या घरावर कर्ज आणि टाकलं शेवटी पोराला इंजिनिअरिंगला! एकडे पोरगं मात्र बघतय वाट CAP च्या Result ची!!
क्रमशः

शनिवार, ८ ऑगस्ट, २००९

वाळवंट !

आज पुन्हा एकदा तीच सुरुवात - तेच झोपेतुन उठणे, तीच पुन्हा अंघोळ, तेच परत जेवन, तीच दुपारची छानशी वामकुक्षी, तोच पुन्हा ४:०० चा चहा, तेच तेच तेच तेच ...... आणि फक्त तेच. आयुष्य जणू एक साचाच बनला आहे. कधी कल्पना देखील केली नव्हती की आयुष्य असे इतके सरळसोट बनेल!

तसे पाहता वरून केवळ एक नीरव शांतताच दिसत असते. परंतु आत कोठेतरी एक लाव्हा सतत उफाळत असतो - सदान्-कदा बंड पुकारत असतो, मनाच्या तटबंदीला रोज असंख्य बाभळी बोचत असतात; परंतु ना त्याच्या खुणा दिसतात ना दिसते अखंड वाहणारे लाल पाट! फक्त आतुन काही तरी जळत असते - सलत असते अखंड काहीतरी.... खुप आक्रोश करावासा वाटतो पण..... पण या आक्रंदनांचा ना आवाज येतो ना अश्रुधारा वाहतात. सर्व काही शांत्,फक्त वरून - आतून मात्र संग्राम अखंड संग्राम!! रोज क्षणोक्षणी हलाहल पिऊन ना मी नीलकंठ झालो ना नागराज!

प्रत्येक पाण्यात आकंठ बुडलो होय आकंठ - अगदी नाका - तोंडात पाणी जाईपर्यंत तरीही बाहेर पडलो तो केवळ कोरडा - कोरडा ठणठणीत! आयुष्य एक वाळवंट झाले आहे - तेही सदाहरित!! उडेल का इथे एक अल्लड नादान फुलपाखरु? उमलेल का कधी इथे एक सुंदरशी कळी? खरेच या वाळवंटाचा कधी होईल का बगीचा? की असेल ते एक छोटसंच ओएसिस - उरलेलं सगळ रन आणखी भाजुन काढणारं!


Powered By Blogger