सोमवार, २८ सप्टेंबर, २००९

आपणा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!




साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानल्या

गेलेल्या दसर्‍यानिमित्त

आपल्या सर्वांना मनःपुर्वक शुभेच्छा !

शनिवार, २६ सप्टेंबर, २००९

राणीची झोप

आज का कोणास ठाऊक पण सहजच एक गोष्ट आठवली. अगदी लहान असताना ऐकलेली. आजोबांनी सांगितलेली - त्यांच्याच कुशीत बसून ऐकलेली. ती गोष्ट आहे राणीची झोप. आजोबा अशा काही प्रकारे गोष्टी सांगायचे की ऐकणारी आम्ही पोरं तल्लीन होऊन जात असू. वरवर पाहता अगदी साध्या होत्या त्या. मुळातच आजोबा खेड्याचे त्यामुळे गोष्टीही तश्याच अगदी साध्या. पण का कोण जाणे जसजसे आम्ही मोठे होत गेलो त्या गोष्टींचे असंख्य पैलू नजरेस येत गेले; एक एक गोष्ट जणु असंख्य पैलू पाडलेले हिरेच! त्या रात्री आजोबांनी सांगितलेली राणीची ती गोष्ट अजूनही आठवते.
एक राणी होती. राजाची सर्वांत लाडकी. पण राजा त्या राणीबद्द्ल खुप चिंतेत होता; कारण त्या राणीला रात्री झोपच येत नसे, जरा झोपण्याचा प्रयत्न केला की उशी किंवा गादी तिला टोचत असे. राजाने सर्व प्रयत्न केले पण काही निष्पन्न झाले नाही. न राजाला न प्रजेला कळत होते की राणीच्या त्रासाचे कारण तरी काय आहे. राजाने राणीसाठी खास मोरपिसी गादी बनवली पण पण ती देखील तिला टोचत होती. नंतर राजाने खास राणीसाठी गुलाबांची गादी बनवली पण त्या गादीच्या अगदी खालील बाजूस असलेल्या गुलाबाचा एक छोटासा काटा तिला टोचत होता. राजाला कळेना की काय करावे. एके दिवशी राजाच्या दरबारात एक विद्वान आले त्यांनी राजाला सांगितले की, "हे राजा मी तुझ्या राणीच्या त्रासाचे कारण हुडकून काढले आहे". हे ऐकून राजा खूप खुश झाला. पण त्या विद्वानाने एक अट घातली की तो जे सांगेल ते राजाने केले पाहिजे. यांस देखील राजा तयार झाला. ठरल्याप्रमाणे एके दिवशी राणीने वेशांतर केले. राणीला असे सांगण्यात आले की संध्याकाळ होताच पहारेकरी आपणांस महालात परत आणतील तोपर्यंत आपण प्रजेत राहून तिचे हाल-हवाल जाणून घ्यावे. राणी त्या दिवशी एकटीच राज्यात फिरली पण का कोणास ठाऊक पण रात्र होत आली परंतु महालातून कोणी तिला घेऊन जाण्यास आलेच नाही. राणी तशीच महालाकडे जात असता तिला एका म्हातारीने हटकले, विचारले "कुठं चाललीस पोरी?". राणीने सांगितले, "राजवाड्यात". म्हातारी म्हणाली, "राजवाडा तर संध्याकाळीच बंद झाला आणि सकाळशिवाय उघडणार नाही". हे ऐकून राणी फार चिंतेत पडली. ते पाहून म्हातारी म्हणाली, "असं कर पोरी आज माझ्या झोपडीत निज आणि उद्या सकाळी जा त्या राजवाड्यावर". राणीने होकार दिला. राणी तिच्या मागे चालू लागली. काही अंतरावरच म्हातारीची छोटीशी झोपडी होती. झोपडीत जाताच म्हातारीने तवा टाकून दोन गरम गरम भाकरी बनवल्या प्रत्येकीवर ठेच्याची चिमूट ठेवली एक स्वतः खाल्ली व एक राणीला दिली. दिवसभर हिंडल्याने राणीला देखील खूप भूक लागली होती त्यामु़ळे तिने ती ठेचा-भाकर आवडीने खाल्ली. नंतर म्हातारीने अंथरुण टाकले - अंथरुण कसले तर एक फाटकी गोधडी! राणी त्या रात्री त्या गोधडीवरच निजली. का कोण जाणे पण आज राणीला काही टोचत नव्हते. काही वेळातच राणीला गाढ झोप लागली. दुसर्‍या दिवशी सकाळी राणी परत राजवाड्यात गेली. तिने राजाला सर्व हकीकत सांगितली. राजाला अजून देखील कळत नव्हते की राणीच्या त्रासाचे कारण काय? त्याने राणीने सांगितलेली सर्व हकीकत त्या विद्वानाला सांगितली व त्याला याचे कारण विचारले. त्यावर विद्वान म्हणाला की, "राजन राणीला मुळात गादी टोचत नव्ह्ती तर तिला सभोवतालचे सुख टोचत होते".
खरे सांगायला गेल्यास त्याकाळी आम्हाला या गोष्टीचे ओ की ठो कळले नव्हते. पण आज ज्या ज्या वेळेस आजोबा आठवतात त्या त्या वेळेस त्यांच्या उबदार कुशीत बसून ऐकलेल्या गोष्टी आठवतात. पुर्ण आठवत असतीलच असे नाही तुटक-तुटकच आठवतात. पण त्या गोष्टींचे प्रत्येक पैलू दिवसागणिक नजरेस पडत जातात व त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेस मनात एक नवीन घर करून जाते. आज आजोबा नाहीत पण त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याकाळी न कळलेल्या व आज कळून चुकलेल्या अर्थांसकट आजोबांची तिच प्रेमळ, उबदार कूस देऊन जाते.

मंगळवार, २२ सप्टेंबर, २००९

'पट्टे' पुराण!


काल मी, राहूल आणि शंकर सलमान खानचा "वाँटेड" पहायला गेलो होतो. तिकीट वगैरे घेतल्यानंतर चित्रपट चालू होण्यास अजून बराच वेळ असल्याने आम्ही बाहेरच गप्पा मारत थांबलो होतो.
"तुला एक गंमत सांगायचीय !" - शंकर अचानक मध्येच म्हणाला.
तेव्हढ्यात राहूलने त्याच्यावर दोन-तीन स्तुतीसुमने(!) उधळली.
"काय भानगड काय आहे ?" - मी
"काल राहूलने बेल्ट घेतलाय - नवीन !"
"मग" - मी
आता तर राहूल त्याच्यावर धावूनच गेला. वाटले, खरीच काहीतरी भानगड आहे.
एकतर आम्हाला दुसर्‍यांच्या भानगडीत खुपच 'इंट्रेष्ट' आणि त्यात ती जर राहूलची असेल तर 'बात छोड'!
मी राहूलला आवरले.
शंकरने सुरुवात केली - "काल राहूलने नवीन बेल्ट खरेदी केलाय !"
"मग" - मी
"राहुल्या दाखव बे !" - शंकर
राहूलने सुटलेल्या पोटासहीत त्याचा तो 'नवीन' पट्टा दाखवला.
"चांगला तर आहे की ?" - मी
"गेस कर किंमत काय असेल ?" - शंकर
मी - "असेल ६०-७० रुपये..."
शंकरने डोक्याला हात लावला!
"मग पन्नास !" - मी
राहूल गालातल्या गालात हसला!!
"का काय झाले ?" - मी
"हट! चाळीसचा आहे तो !!" - इति शंकर
"मग...." - मी
शंकर - "काल मी आणि राहूल्या त्याच्यासाठी पट्टा खरेदी करायला गेलेलो होतो. ह्याने तब्ब्ल १० - १५ पट्टे पाहिल्यानंतर हा घेतला. त्याने किंमत सांगितली '४० रू.' आणि राहूल्या 'पन्नास रूपयाला देत असाल तर घेतो!' दुकानदार - 'जमत नाही साहेब चाळीसला घ्यायचा असेल तर घ्या!' पण हा काही पन्नाशी सोडेना आणि तो चाळीशी! हा मुर्ख आणि तो महामुर्ख!! तरी मी सांगितलं 'राहूल्या तीसला माग बे ......!' हा मात्र त्याच्याशी हुज्जत घालू लागला. थोड्या वेळाने त्या दुकानदारचीच ट्युब पेटली; त्यानं शेवटी ह्याला पन्न्न्नास रूपयाला पट्टा विकला आणि जाताना आम्हाला न विसरता म्हणाला 'या परत!!' "
बाकीचे ऐकण्याआधीच राहूल चित्रपटगृहात शिरला!
मागून शंकर ओरडत होता - "द ग्रेट बारगेनर, राहूल महाराज की..........."
"जय!" - मी

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २००९

कारण....

हरलेली लढाई
आज पुन्हा लढणार आहे

गंजलेली तलवार
आज पुन्हा म्यानातून काढणार आहे

तिचे
त्याचे
आपल्यांचे
परक्यांचे
माणसांचे
आणि 'जना'वरांचे

शब्दांचे वार
नि:शब्द वार
कोमल वार
कठोर वार
सरळ वार
वाकडे वार
नुसतेच वार
पण वार

आज पुन्हा परतवणार आहे
कारण....
हरलेली लढाई
आज पुन्हा लढणार आहे

बुधवार, ९ सप्टेंबर, २००९

हिटलरची अनौरस पोरं

मुळात नाझी जर्मनीतील ज्यु लोकांवर झालेल्या अत्याचाराला आणि नाझी छळछावण्यांना खुप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाल्याने त्या काळातील भरमसाठ बाबी दुर्लक्षितच राहिल्या. ज्युंचा झालेला संहारच इतका भयंकर होता की तत्कालीन मुलांच्या स्थितीबद्द्ल भाष्य करण्यात तसेच संशोधनास आपसुकच दुर्लक्ष झाले.

दुस
र्‍या महायुद्धामुळे नाझी जर्मनीतील तसेच इतर राष्ट्रांतील मुलांचे बालपण या ना त्या कारणाने होरपळून निघाले. नाझींच्या जुलमी धोरणांमुळे छळामुळे प्रत्यक्षरित्या बळी पडलेल्या मुलांची संख्या अंदाजे १५ लाखांपेक्षा अधिक वर्तविली जाते. त्यात सुमारे १२ लक्ष ज्यु मुले, १० हजाराहून अधिक जिप्सी मुले आणि हजारो शारिरीक व मानसिक अपंगांनी विविध कारणांनी प्राण गमावले. जरी ज्यु मुले हे नाझींचे मुख्य लक्ष्य ठरली तरी शेकड्याने ज्युऐतर मुलं हिटलरच्या तथाकथित धोरणांची बळी ठरली. त्यांचे बालपण शुद्ध वं - सक्षम वंश, सक्षम समाज यांसारख्या अनेक आदर्शाना बळी ठरले. जी मुलं नाझींच्या तथाकथित आदर्शात बसत नव्हती त्यांना त्यांच्या कुटूंबापासून, समाजापासून अलग करून त्यांचे अत्यंत क्रुरपणे निर्दालन करण्यात आले. सक्षम-सुद्रुढ समाज बनवण्याच्या मार्गात अडसर ठरल्याने शेकड्याने शारीरिक व मानसिक द्रुष्ट्या अपंग मुलांची कत्तलकरण्यात आली. अशा अनौरस अक्षम मुलांपासून मुक्त समाज बनवण्याच्या हेतुने नाझींनी खास मोहीम आखली.


पहिल्या महायुद्धानंतर माजलेल्या आर्थिक व सामाजिक अनागोंदीचा फायदा उठवत नाझींनी स्वतःचे एक वेगळे साम्राज्य निर्माण केले. एका विशिष्ठ समाजाला आरोपी ठरवून तथाकथित आदर्शवाद त्यांनी जनमानसात रुजवला. जर्मन जनतेत त्यांनी दहशत निर्माण केली. अशा भेदरलेल्या समाजाचा तसेच गुप्त पोलीस यंत्रनेचा व नाझी आदर्शवादाने भारावलेल्या युवकांचा अक्षम मुलांना अलग करुन त्यांना मानसोपचार केंद्र म्हणवल्या जाणार्‍या कत्तलखान्यात धाडण्यासाठी वापर करण्यात आला. दुर्बलांचा आवाज दडपवण्यात अग्रेसर असलेल्या नाझींनी वैद्यकीय शास्त्रज्ञ तसेच मानसोपचार तज्ञ यांचा एक गट तयार केला व अशा अनौरस मुलांच्या निर्दालनाच्या योजनेची व त्याच्या अंमलबजावनीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली; हा गट तत्सम क्षेत्रात वर्चस्व राखून होता. हिटलरच्या आदर्शवादाने भारावलेल्या जुलमी नाझी विचारसारणीला दुर्बल मुले हकनाक बळी पडली; एकेकाळची आदर्श सामाजिक संस्थाने - शाळा, महाविद्यालये, दवाखाने काराग्रहे, छळछावन्या व कत्तल करण्याची केंद्रे बनली. अशा मुलांच्या पालकांचा आवाज दडपवून टाकण्यात आला; अशा निर्दालनास त्यांची जणू संमतीच आहे असे भासण्यात आले; अशा केसेसबद्द्ल न्यायालयात दाद मागण्यास मज्जाव करण्यात आला. एकेकाळी आदर्श म्हणून गणली गेलेली, व्यंग असलेल्या व्यक्तींना देखील समान वागणूक देणारी सर्व समावेशक सामाजिक व शैक्षणिक समानतावादी व्यवस्था हिटलरच्या नाझी विचारसारणीची बळी ठरली.

संदर्भ : Hitler's Unwanted Children
Powered By Blogger