मंगळवार, २२ सप्टेंबर, २००९

'पट्टे' पुराण!


काल मी, राहूल आणि शंकर सलमान खानचा "वाँटेड" पहायला गेलो होतो. तिकीट वगैरे घेतल्यानंतर चित्रपट चालू होण्यास अजून बराच वेळ असल्याने आम्ही बाहेरच गप्पा मारत थांबलो होतो.
"तुला एक गंमत सांगायचीय !" - शंकर अचानक मध्येच म्हणाला.
तेव्हढ्यात राहूलने त्याच्यावर दोन-तीन स्तुतीसुमने(!) उधळली.
"काय भानगड काय आहे ?" - मी
"काल राहूलने बेल्ट घेतलाय - नवीन !"
"मग" - मी
आता तर राहूल त्याच्यावर धावूनच गेला. वाटले, खरीच काहीतरी भानगड आहे.
एकतर आम्हाला दुसर्‍यांच्या भानगडीत खुपच 'इंट्रेष्ट' आणि त्यात ती जर राहूलची असेल तर 'बात छोड'!
मी राहूलला आवरले.
शंकरने सुरुवात केली - "काल राहूलने नवीन बेल्ट खरेदी केलाय !"
"मग" - मी
"राहुल्या दाखव बे !" - शंकर
राहूलने सुटलेल्या पोटासहीत त्याचा तो 'नवीन' पट्टा दाखवला.
"चांगला तर आहे की ?" - मी
"गेस कर किंमत काय असेल ?" - शंकर
मी - "असेल ६०-७० रुपये..."
शंकरने डोक्याला हात लावला!
"मग पन्नास !" - मी
राहूल गालातल्या गालात हसला!!
"का काय झाले ?" - मी
"हट! चाळीसचा आहे तो !!" - इति शंकर
"मग...." - मी
शंकर - "काल मी आणि राहूल्या त्याच्यासाठी पट्टा खरेदी करायला गेलेलो होतो. ह्याने तब्ब्ल १० - १५ पट्टे पाहिल्यानंतर हा घेतला. त्याने किंमत सांगितली '४० रू.' आणि राहूल्या 'पन्नास रूपयाला देत असाल तर घेतो!' दुकानदार - 'जमत नाही साहेब चाळीसला घ्यायचा असेल तर घ्या!' पण हा काही पन्नाशी सोडेना आणि तो चाळीशी! हा मुर्ख आणि तो महामुर्ख!! तरी मी सांगितलं 'राहूल्या तीसला माग बे ......!' हा मात्र त्याच्याशी हुज्जत घालू लागला. थोड्या वेळाने त्या दुकानदारचीच ट्युब पेटली; त्यानं शेवटी ह्याला पन्न्न्नास रूपयाला पट्टा विकला आणि जाताना आम्हाला न विसरता म्हणाला 'या परत!!' "
बाकीचे ऐकण्याआधीच राहूल चित्रपटगृहात शिरला!
मागून शंकर ओरडत होता - "द ग्रेट बारगेनर, राहूल महाराज की..........."
"जय!" - मी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger