शनिवार, २६ सप्टेंबर, २००९

राणीची झोप

आज का कोणास ठाऊक पण सहजच एक गोष्ट आठवली. अगदी लहान असताना ऐकलेली. आजोबांनी सांगितलेली - त्यांच्याच कुशीत बसून ऐकलेली. ती गोष्ट आहे राणीची झोप. आजोबा अशा काही प्रकारे गोष्टी सांगायचे की ऐकणारी आम्ही पोरं तल्लीन होऊन जात असू. वरवर पाहता अगदी साध्या होत्या त्या. मुळातच आजोबा खेड्याचे त्यामुळे गोष्टीही तश्याच अगदी साध्या. पण का कोण जाणे जसजसे आम्ही मोठे होत गेलो त्या गोष्टींचे असंख्य पैलू नजरेस येत गेले; एक एक गोष्ट जणु असंख्य पैलू पाडलेले हिरेच! त्या रात्री आजोबांनी सांगितलेली राणीची ती गोष्ट अजूनही आठवते.
एक राणी होती. राजाची सर्वांत लाडकी. पण राजा त्या राणीबद्द्ल खुप चिंतेत होता; कारण त्या राणीला रात्री झोपच येत नसे, जरा झोपण्याचा प्रयत्न केला की उशी किंवा गादी तिला टोचत असे. राजाने सर्व प्रयत्न केले पण काही निष्पन्न झाले नाही. न राजाला न प्रजेला कळत होते की राणीच्या त्रासाचे कारण तरी काय आहे. राजाने राणीसाठी खास मोरपिसी गादी बनवली पण पण ती देखील तिला टोचत होती. नंतर राजाने खास राणीसाठी गुलाबांची गादी बनवली पण त्या गादीच्या अगदी खालील बाजूस असलेल्या गुलाबाचा एक छोटासा काटा तिला टोचत होता. राजाला कळेना की काय करावे. एके दिवशी राजाच्या दरबारात एक विद्वान आले त्यांनी राजाला सांगितले की, "हे राजा मी तुझ्या राणीच्या त्रासाचे कारण हुडकून काढले आहे". हे ऐकून राजा खूप खुश झाला. पण त्या विद्वानाने एक अट घातली की तो जे सांगेल ते राजाने केले पाहिजे. यांस देखील राजा तयार झाला. ठरल्याप्रमाणे एके दिवशी राणीने वेशांतर केले. राणीला असे सांगण्यात आले की संध्याकाळ होताच पहारेकरी आपणांस महालात परत आणतील तोपर्यंत आपण प्रजेत राहून तिचे हाल-हवाल जाणून घ्यावे. राणी त्या दिवशी एकटीच राज्यात फिरली पण का कोणास ठाऊक पण रात्र होत आली परंतु महालातून कोणी तिला घेऊन जाण्यास आलेच नाही. राणी तशीच महालाकडे जात असता तिला एका म्हातारीने हटकले, विचारले "कुठं चाललीस पोरी?". राणीने सांगितले, "राजवाड्यात". म्हातारी म्हणाली, "राजवाडा तर संध्याकाळीच बंद झाला आणि सकाळशिवाय उघडणार नाही". हे ऐकून राणी फार चिंतेत पडली. ते पाहून म्हातारी म्हणाली, "असं कर पोरी आज माझ्या झोपडीत निज आणि उद्या सकाळी जा त्या राजवाड्यावर". राणीने होकार दिला. राणी तिच्या मागे चालू लागली. काही अंतरावरच म्हातारीची छोटीशी झोपडी होती. झोपडीत जाताच म्हातारीने तवा टाकून दोन गरम गरम भाकरी बनवल्या प्रत्येकीवर ठेच्याची चिमूट ठेवली एक स्वतः खाल्ली व एक राणीला दिली. दिवसभर हिंडल्याने राणीला देखील खूप भूक लागली होती त्यामु़ळे तिने ती ठेचा-भाकर आवडीने खाल्ली. नंतर म्हातारीने अंथरुण टाकले - अंथरुण कसले तर एक फाटकी गोधडी! राणी त्या रात्री त्या गोधडीवरच निजली. का कोण जाणे पण आज राणीला काही टोचत नव्हते. काही वेळातच राणीला गाढ झोप लागली. दुसर्‍या दिवशी सकाळी राणी परत राजवाड्यात गेली. तिने राजाला सर्व हकीकत सांगितली. राजाला अजून देखील कळत नव्हते की राणीच्या त्रासाचे कारण काय? त्याने राणीने सांगितलेली सर्व हकीकत त्या विद्वानाला सांगितली व त्याला याचे कारण विचारले. त्यावर विद्वान म्हणाला की, "राजन राणीला मुळात गादी टोचत नव्ह्ती तर तिला सभोवतालचे सुख टोचत होते".
खरे सांगायला गेल्यास त्याकाळी आम्हाला या गोष्टीचे ओ की ठो कळले नव्हते. पण आज ज्या ज्या वेळेस आजोबा आठवतात त्या त्या वेळेस त्यांच्या उबदार कुशीत बसून ऐकलेल्या गोष्टी आठवतात. पुर्ण आठवत असतीलच असे नाही तुटक-तुटकच आठवतात. पण त्या गोष्टींचे प्रत्येक पैलू दिवसागणिक नजरेस पडत जातात व त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळेस मनात एक नवीन घर करून जाते. आज आजोबा नाहीत पण त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याकाळी न कळलेल्या व आज कळून चुकलेल्या अर्थांसकट आजोबांची तिच प्रेमळ, उबदार कूस देऊन जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Powered By Blogger