बुधवार, २१ ऑक्टोबर, २००९

सुरूवात

कुठून सुरूवात करावी हेच सुचत नाही
कारण वाळवंटात रस्ता कधी दिसत नाही

तु रणातील मृगजळ
मी तहानलेलं हरीण
शोधतोय केव्हाचा तुला
पळतोय तुझ्याच कडे

अशी जाऊ नकोस लांब गं
फक्त तुझ्याचसाठी आलोय सोडून
ते दंडकारण्य, तो मायेचा झरा
तुझ्यासाठी त्यागलाय मी संसार सारा

दिसतेस तु मला अगदी समोरचं
दिसतोय आता शेवट पण, पण...
कुठून सुरूवात करावी हेच सुचत नाही
कारण वाळवंटात रस्ताच कधी दिसत नाही

शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २००९

शुभ दीपावली!


आपणा सर्वांना दिवाळीच्या

लाख-लाख शुभेच्छा!

सोमवार, १२ ऑक्टोबर, २००९

मनं माझे...

जेव्हा जेव्हा मी एखादी ओवी अथवा कडवे वाचतो तेव्हा तेव्हा आपसुकच त्यांत स्वतःचे प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या आदर्शांत स्वतःचे स्थान शोधतो, तसेच यथाशक्ती त्यांना आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. पण का कोण जाणे प्रत्येक वेळी मला वाटते की कोठे तरी काहीतरी चुकत आहे. ज्या गोष्टींना आदर्श मानत असतो त्यांतच गुरफटून जातो. येतात त्या केवळ वेदना! खरेच का आदर्शांना धरून अथवा आचरणात आणून यश मिळवता येते, प्रगती करता येते? आजुबाजुच्या जगात डोकावल्यास लांडी-लबाडी करणारा तर तुपाशी खातो आहे! जेव्हा जेव्हा वाटते की टाकून द्यावे हे सतीचे वाण तेव्हा तेव्हा मनात वसलेला आदर्शवाद उफाळून येतो, पुन्हा मीच स्वतःविरुद्ध बंड करतो पुन्हा एकदा हेच आदर्शवाद रुपी शिवधनुष्य उचलण्यास समर्थ होतो.

मंगळवार, ६ ऑक्टोबर, २००९

छोटीशीच पण गोष्ट!

सात वर्षांच्या अर्नवला गणिताची शिक्षिका एक गणित समजावून सांगत होती - "जर मी तुला एक सफरचंद दिले, अजून एक सफरचंद दिले आणि अजून एक सफरचंद दिले तर तुझ्याजवळ एकून किती सफरचंद असणार?" थोडा वेळ विचार करून अर्नव म्हणाला -"चार!" पण तिला हे उत्तर अपेक्षित नव्हते. तिला वाटले की त्याने निटसे ऐकले नसावे म्हणून ती म्हणाली - "अर्नव नीट लक्ष देऊन ऐक. जर मी तुला एक सफरचंद दिले, अजून एक सफरचंद दिले आणि अजून एक सफरचंद दिले तर तुझ्याजवळ एकून किती सफरचंद असणार?" अर्नव त्याच्या शिक्षिकेच्या चेहर्‍यावरील राग - आगतिकता पाहत होता. त्याने परत आपल्या हातांच्या बोटांद्वारे आकडेमोड केली. त्याला मुळात बरोबर उत्तराशी काही देणे-घेणे नव्हते. त्याला तर त्याच्या बाईंचा चेहरा हसरा पहायचा होता! यावेळी त्याने जरासे अडखळतच उत्तर दिले - "अं......चार."
त्याने तीच आगतिकता आपल्या बाईंच्या चेहर्‍यावर पाहिले, त्याला देखील वाटले काही तरी चुकत आहे. मग त्या शिक्षिकेलाच वाटले की याला सफरचंद आवडत नसावेत, त्यामुळे तिने तोच प्रश्न जरा फिरुन विचारायचे ठरवले - "बर आता ऐक, जर मी तुला एक स्ट्रॉबेरी दिले, अजून एक स्ट्रॉबेरी दिले आणि अजून एक स्ट्रॉबेरी दिले तर तुझ्याजवळ एकून किती स्ट्रॉबेरी असणार?" यावेळी त्याने तिच्या चेहर्‍यावरील राग थोडासा मावळेला पाहिला, त्याने परत हाताची बोटे मोजली. इकडे ती मात्र चिंतेत होती कि या वेळी तर हा बरोबर उत्तर देईल की नाही! बळीचे उसने अवसान आणून अर्नव म्हणाला - ".......तीन?" या उत्तराने झालेलेचे तिचे समाधान पाहून त्याला देखील हुरूप आला. आता परत तिने विचारले - "तर आता सांग, जर मी तुला एक सफरचंद दिले, अजून एक सफरचंद दिले आणि अजून एक सफरचंद दिले तर तुझ्याजवळ एकून किती सफरचंद असणार?" अर्नवने लगेच उत्तर दिले - "चार!" तीने रागानेच विचारले - "अरे बाबा चार कसे असेल रे.......!" अर्नवने भित - भित सांगितले - "कारण टीचर माझ्या बॅग मध्ये आधिच एक सफरचंद आहे."

जर कोणी तुम्हाला अपेक्षित उत्तरापेक्षा वेगळे उत्तर देत असेल तर ते चुकीचे आहे असा गैरसमज करून घेऊ नका. त्याच्या द्रुष्टीकोनातून तेच बरोबर असेल. तर जर तुम्हाला कोणाला समजून घ्यायचे असेल तर त्याच्याविषयीचे पुर्वग्रह बाजुला सारा. तसेच स्वतःच्या समजूती जराशा बाजुला सारून जरा समोरच्याच्या नजरेने देखील जग पहा. कदाचित तुम्हीच चुकीचे असू शकाल पण जर तुम्हाला वाटत असेल की आपण खरेच बरोबर आहोत तर त्याला त्याची चुक अवश्य दाखवून द्या.
--------------------------------------------------------------------------
मुळात ही गोष्ट मला मेलद्वारे आलेली आहे, मनाला भावली म्हणून इथे टाकली. तिच्यात मुळ लेखकाचे नाव दिलेले नाहीये. जर कोणाला माहीत असल्यास अवश्य कळवा.

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

विडंबन

--------------------------------------------------------------------------
परवा रद्दी आवरत असता रद्दीत ९ ऑगस्ट चे सप्तरंग हातात आले. त्यावरच
मी एक विडंबन लिहीले होते. "चांदोबा चांदोबा भागलास का?" चे! आज
पाठवू उद्या पाठवू असा कंटाळा करून पाठवचेच विसरून गेलो.
तेच विडंबन इथे टंकवत आहे.
--------------------------------------------------------------------------

मंत्रीबुवा मंत्रीबुवा दमलात का?
चमच्यांच्या गराड्यात दडलात का?

चमच्यांचा गराडा आनंदी
प्रजेचा सेवक स्वच्छंदी

जरासा इकडे येऊन जा
प्रजेचे हाल ऐकून जा

आश्वासनांच्या मोठाल्या राशी
मंत्रीबुवा प्रजेला ना पुशी

----बाळराजे
Powered By Blogger