कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २१ ऑक्टोबर, २००९

सुरूवात

कुठून सुरूवात करावी हेच सुचत नाही
कारण वाळवंटात रस्ता कधी दिसत नाही

तु रणातील मृगजळ
मी तहानलेलं हरीण
शोधतोय केव्हाचा तुला
पळतोय तुझ्याच कडे

अशी जाऊ नकोस लांब गं
फक्त तुझ्याचसाठी आलोय सोडून
ते दंडकारण्य, तो मायेचा झरा
तुझ्यासाठी त्यागलाय मी संसार सारा

दिसतेस तु मला अगदी समोरचं
दिसतोय आता शेवट पण, पण...
कुठून सुरूवात करावी हेच सुचत नाही
कारण वाळवंटात रस्ताच कधी दिसत नाही

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

विडंबन

--------------------------------------------------------------------------
परवा रद्दी आवरत असता रद्दीत ९ ऑगस्ट चे सप्तरंग हातात आले. त्यावरच
मी एक विडंबन लिहीले होते. "चांदोबा चांदोबा भागलास का?" चे! आज
पाठवू उद्या पाठवू असा कंटाळा करून पाठवचेच विसरून गेलो.
तेच विडंबन इथे टंकवत आहे.
--------------------------------------------------------------------------

मंत्रीबुवा मंत्रीबुवा दमलात का?
चमच्यांच्या गराड्यात दडलात का?

चमच्यांचा गराडा आनंदी
प्रजेचा सेवक स्वच्छंदी

जरासा इकडे येऊन जा
प्रजेचे हाल ऐकून जा

आश्वासनांच्या मोठाल्या राशी
मंत्रीबुवा प्रजेला ना पुशी

----बाळराजे

शुक्रवार, १८ सप्टेंबर, २००९

कारण....

हरलेली लढाई
आज पुन्हा लढणार आहे

गंजलेली तलवार
आज पुन्हा म्यानातून काढणार आहे

तिचे
त्याचे
आपल्यांचे
परक्यांचे
माणसांचे
आणि 'जना'वरांचे

शब्दांचे वार
नि:शब्द वार
कोमल वार
कठोर वार
सरळ वार
वाकडे वार
नुसतेच वार
पण वार

आज पुन्हा परतवणार आहे
कारण....
हरलेली लढाई
आज पुन्हा लढणार आहे

बुधवार, १९ ऑगस्ट, २००९

बंड


आज बंड करायचाय मला तुझ्याविरुद्ध
होय फोडून काढायचय तुला चाबकांनी
पिचलेल्या मना खुन करायचाय तुझा
पुन्हा एकदा द्यायचाय जन्म क्रांतीला
तोडून द्यायची आहेत सारी खोटी बंधने
पुन्हा उधळायचय मला बेभान माजून
घडवायचय नवीन जग पुन्हा एकदा
माणूस बनवायचाय मला या माकडांतून
शिकवायचीय त्याला पुन्हा एकदा नैतिकता
ठासून भरायचीय मला त्याच्यात हिंमत
पुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी काळाच्यापुढे
बनवायचय त्याला सक्षम पोलादासारखं
पुन्हा एकदा बंड करण्यासाठी तुझ्याविरुद्ध

----बाळराजे

मंगळवार, १८ ऑगस्ट, २००९

सर

जेव्हा भर उन्हात पावसाची सर आली
पुन्हा एकदा आज तुझी आठवण आली
सरीसारखीच आली होतीस जीवनात
आठवतय तेव्हा देखील उन्हाळाच होता....इथे

बरसली होतीस, थैमान घातला होतास
अगदी पुरता वाहून गेलो होतो त्यात मी
कशी बाहूत कोसळली होतीस मनापासुन
आठवतय तेव्हा देखील तहानलेलाच होतो....आजच्यासारखा

गेलीस देखील आल्यासारखी तडकाफडकी
तेव्हा ही आला होता पूर इथे - माझ्या डोळ्यांत
पहायचस तरी मागे वळून तिथेच होतो मी
आठवतय का तेव्हा देखील जळतच होतो....सुर्यासारखा

येशील का पुन्हा एकदा, बरसशील का इथे
विझवशील का अखंड जळणारे हे जंगल
वसवशील का नंदनवन या ओसाड रानात
आठवतय तेव्हा देखील माळरानच होतं....आजच्यासारखं

----बाळराजे

रविवार, १६ ऑगस्ट, २००९

प्लिज जरा थांबशील का ?

प्लिज जरा थांबशील का?
नाही मी रागावणार नाही
पण चार शब्द ऐकूनच जा
अगदी शेवटचे...........

तु मुळात बरोबरच आहेस
चुकलो तो केवळ मीच
वेड्या मनाला कळलेच नाही
तुझ्या गालावरची ती खळी
अगदी चिरतरुण आहे ते

तुझे ते स्मित वाटले जणु
रणरणत्या ग्रिष्मात पाऊस
बरसतोय जणु माझ्याचसाठी
भिजलो त्यात चिंब अनेकदा

तेच तुला आज सांगितले
केवळ शब्दांतून..........

नाही म्हणालीस...ठीक आहे
पण तुला काही सांगायचे आहे
अगदी शेवटचेच...........

तुच होतीस एक शांत झुळूक
या करपलेल्या आयुष्यातली
तुच होतीस गर्द सावली
या ओसाड वाळवंटातली

तु नसणार यापुढे...
पण तुझ्या आठवणी...
राहतील अगदी चिरतरुण
तुझ्या गालावरच्या खळीसारख्या

सदैव राहशील तु मनात
एक कवडसा म्हणून...सुखाचा

आणि हो जाता जाता...
तुझा आजचा नकार...
असेल माझ्या आयुष्यातल्या
एका सुखद क्षणांचा अंत

एवढेच.........बस्स....

----बाळराजे
Powered By Blogger